विराण्या : अभंग २५ - Part 1

७.
वाळो जन मज म्हणोत शिंदळी ।
परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक जालियें उदास ।
नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां ।
म्हणे जालों तुका हरिरता ॥३॥

८.
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा ।
म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ॥१॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी ।
क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥२॥
नाम गॊष्टी माझी सोय सांडा आतां ।
रातलें अनंता तुका म्हणे ॥३॥

९.
हाचि नेम आतां न फिरें माघारी ।
बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥
घररिघी जालें प^õराणी बळें ।
वरिलें सांवळें परब्रह्म ॥२॥
बळियाचा अंगसंग जाला आतां ।
नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

१०.
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें ।
होतें गुप्त ठावें केलें आतां ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका ।
न सर ती लोकांमाजी जालें ॥२॥
न धरावा लोभ कांही मजविशीं ।
जालें देवपिशी तुका म्हणे ॥३॥

११.
विसरले कुळ आपुला आचार ।
पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता ।
रातलें अनंता चित्त माझें ॥२॥
मज आतां कोणी आळवाल झणी ।
तुका म्हणे कानीं बहिरी जालें ॥३॥

१२.
न देखें न बोलें नाइकें आणीक ।
बैसला हा एक हरि चित्तीं ॥१॥
सासुरें माहेर मज नाहीं कोणी ।
एक केलें दोन्ही मिळोनियां ॥२॥
आळ आला होता आम्ही भांडखोरी ।
तुका म्हणे खरी केली मात ॥३॥

१३.
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां ।
हरि या अनंता पासूनिया ॥१॥
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता ।
करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा ।
जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥

१४.
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट ।
साधिलें अवीट निजसुख ॥१॥
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी ।
अधिक चि परी दु:खाचिया ॥२॥
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां ।
राहिलों अनंताचिये पायीं ॥३॥

१५.
आह्मां आह्मी आतां वडील धाकुटीं ।
नाहीं पाठीं पोटी कोणी दुजे ॥१॥
फावला एकांत एकविध भाव ।
हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥२॥
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं ।
असों जेथें नाही दुजे कोणी ॥३॥

१६.
सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ ।
तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार ।
रातलों या परपुरुषाशी ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं ।
औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥

१७.
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं ।
वेगळीक कांही नव्हे आतां ॥१॥
नारायणा आह्मां नाहीं वेगळीक ।
पुरविली हे भाक सांभाळिलि ॥२॥
तुका म्हणे जाले सायासाचें फळ ।
सरली ते वेळ काळ दोन्ही ॥३॥

१८.
हासों रूसॊं आतां वाढवूं आवडी ।
अंतरींची गोडी अवीट ते ॥१॥
सेवासुखें करूं विनोदवचन ।
आह्मी नारायण एकाएकीं ॥२॥
तुका म्हणे आह्मी जालों उदासीन ।
अपुल्या आधीन केला पति ॥३॥

१९.
मजसवें आतां येऊं नका कोणी ।
सासुरवासिनी बाइयानो ॥१॥
न साहवे तुह्मां या जनाची कूट ।
बोलती वाईट ओखटें तें ॥२॥
तुका म्हणे जालों उदास मोकळ्या ।
विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥३॥

२०.
शिकविलें तुह्मी तें राहे तोंवरी ।
मज आणि हरी वियोग तों ॥१॥
प्रसंगी या नाहीं देहाची भावना ।
तेथें या वचना कोण मानी ॥२॥
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत ।
दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥३॥

२१.
सांगतों तें तुह्मीं अइकावें कानीं ।
आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥
जोंवरी या तुह्मां मागिलांची आस ।
तोंवरी उदास होऊं नका ॥२॥
तुका म्हणे काय वांयांविण धिंद ।
पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥

२२.
आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण ।
कौतुकें खेळणें संग होता ॥१॥
आतां अनावर जालें अगुनाची ।
करूं नये तें जिं करीं सुखें ॥२॥
तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही ।
कुळें एक मनीं नारायण ॥३॥

२३.
सासुरियां वीट आला भरतारा ।
इकडे मोहरा स्वभावें चि ॥१॥
सांडवर कोणी न धरिती हातीं ।
प्रारब्धांची गति भोगूं आतां ॥२॥
न व्हावी ते जाली आमुची भंडाई ।
तुक म्हणे काई लाजों आतां ॥३॥

२४.
मरणाही आधीं राहिलों मरोनी ।
मग केलें मनीं होतें तैसें ॥१॥
आतां तुह्मी पाहा आमुचें नवल ।
नका वेचूं बोल वांयांविण ॥२॥
तुका म्हणे तुह्मी भयाभीत नारी ।
कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥३॥

२५.
परपुरुषाचें सुख भोगे तरी ।
उतरोनि करीं घ्यावें सीस ॥१॥
संवसारा आगी आपुलेनि हातें ।
लावूनि मागुतें पाहूं नये ॥२॥
तुका म्हणे व्हावें तयापरी धीट ।
पतंग हा नीट दीपासोई ॥३॥

२६.
अइकाल परी ऐसें नव्हे बाई ।
न संडा या सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून ।
आपुल्या आपण गोविलें तें ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण ।
त्या या निवडोन मजपाशीं ॥३॥

२७.
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही ।
न लगा गडणी आह्मां तैशा ॥१॥
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा ।
आवरूनि मना बंद द्यावा ॥२॥
तुका म्हणे कांगीं अभ्यासावांचुनी ।
नव्हे हे करणी भलतीची \\३॥

२८.
बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी ।
कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ ।
लटिकें तें मूळ फजितीजें ॥२॥
तुका म्हणे तुह्मी करा घटापटा ।
नका जाऊं वाटा आमुजिया ॥३॥

२९.
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा ।
कठिण हें जिवा तोंचिवरी ॥१॥
मागिलांचे दु:ख लागों नेदी अंगा ।
अंतर हें संगा नेदी पुढें ॥२॥
तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न ।
जाणती महिमान श्रुति ऐसें ॥३॥

३०.
न राहे रसना बोलतां आवडी ।
पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥१॥
मानेल त्या तुह्मी अइका स्वभावें ।
मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥२॥
तुका म्हणे तुह्मीं फिरावें बहुतीं ।
माझी तों हे गती जाली आतां ॥३॥

३१.
न बोलतां तुह्मां कळों न ये गुज ।
ह्मणउनी लाज सांडिअयेली ॥१॥
आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात ।
नका कोणी अंत पाहों माझा ॥२॥
तुका म्हणे आह्मी बैसलों शेजारीं ।
करील तें हरी पाहों आतां ॥२॥

३२.
नये जरी तुअज मधुर उत्तर ।
दिधला सुस्वर नाहीं देवें ॥१॥
नाहीं तयाविण भुकेला विaöल ।
येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥
देवापाशीं मागें आवडीची भक्ति ।
विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥२॥
तुका म्हणे मना सांगतों विचार ।
धरावा निर्धार दिसेंदिस ॥३॥

३३.
सावध जालों सावध जालों ।
हरिच्या आलों जागरणा ॥१॥
तेथें वैष्णवांचे भार ।
जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥
पळोनियां गेली झोप ।
होतें पाप आड तें ॥२॥
तुका म्हणे त्या ठाया ।
ओल छाया कृपेची ॥३॥

३४.
आपुलिया हिता जो असे जागता ।
धन्य माता पिता तयाचिया ॥१॥
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक ।
तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥
गीता भागवत करिती श्रवण ।
आणीक चिंतन विठॊबाचें ॥२॥
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा ।
तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

३५.
अंतरींची घेतो गोडी ।
पाहे जोडी भावाची ॥१॥
देव सोयरा देव सोयरा ।
देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥
अपुल्या वैभवें ।
शृंगारावे निर्मळ ॥२॥
तुका म्हणे जेवी सेवें ।प्रेम द्यावें प्रीतीचें ॥३॥

३६.
सुखें वोळंब दावी गोहा ।
माझें दु:ख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा ।
होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥
निपट मज न चले अन्न ।
पायली गहूं सांजा तीन ॥२॥
गेले वारीं तुह्मीं आणिली साकर ।
सातदी गेली साडेदहा शेर ॥३॥
अखंड मज पोटाची व्यथा ।
दुधभात साकर तूप पथ्या ॥४॥
दो पाहरा मज लहरी येती ।
शुद्ध नाहीं पडे सुपती ॥५॥
नीज नये घाली फुलें ।
जवळीं न साहती मुलें ॥६॥
अंगी चंदन लावितें भाळीं ।
सदा शूळ माझे कपाळीं ॥७॥
हाड गळोनि आलें मास ।
माझें दु:ख तुह्मां नेणवे कैसें ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला ।
मेलियावरि नरका नेला ॥९॥

३७.
पावलें पावलें तुझें आह्मां सर्व ।
दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथें तेथें तुझीं च पाउलें ।
त्रिभुवन संचलें विaला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद ।
आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं ।
नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥

३८.
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी ।
पूर्वकर्मा होळी करूनी सांडूं ॥१॥
अमुप हे गांठी बांधूं भांडवल ।
अनाथा विaल आह्मां जोगा ॥ध्रु.॥
अवघे होती लाभ एका या चिंतने ।
नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥२॥
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा ।
होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥३॥
गेले पुढें त्यांचा शोधीत मारग ।
चला जाऊं माग घेत आह्मी ॥४॥
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा ।
जाऊं त्या मोहरा निजाचिया ॥५॥

३९. जेविले ते संत मागें उष्टावळी ।
अवघ्या पत्रावळी करूनी झाडा ॥१॥
सोवळ्या ऒंवळ्या राहिलों निराळा ।
पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥
परें परतें मज न लागे सांगावें ।
हें तों देवें बरें शिकविलें ॥२॥
दुस-यातें आह्मी नाहीं आतळात ।
जाणोनि संकेत उभा असे ॥३॥
येथॆं कोणीं कांही न धरावी शंका ।
मज चाड एका भोजनाची ॥४॥
लांचावला तुका मारितसे झड ।
पुरविलें कोड नारायणें ॥५॥

४०.
देवाच्या प्रसादें करा रे भोजन ।
व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥१॥
ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट ।
नका मानूं वीट ब्रह्मारसीं ॥ध्रु.॥
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र ।
अधिकार सर्वत्र आहे येथें ॥२॥
इच्छादानी येथें वळला समर्थ ।
अवघें चि आर्त पुरवितो ॥३॥
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं ।
पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥४॥
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या होतें ।
कामारीसांगातें निरुपम ॥५॥