मंगलाचरण : अभंग ६

१.
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी ।
तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ ।
तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक पदें दु:खाची शिराणी ।
तेथें दुच्श्रित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म ।
जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥

२.
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥

३.
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम ।
देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं ।
संचरोनि राहीं ह्र्दयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांही न मागे आणीक ।
तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥

४.
राजस सुकुमार मदनाचा पुतळा ।
रविशशिकळा लोपलिया ॥१॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी ।
रूळे माळ कंठी वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें ।
सुखाचें ओतलें सकळ ही ॥२॥
कासे सोनसळा पांधरे पाटोळा ।
धननीळ सांवळा बाइयानो ॥३॥
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा ।
तुका म्हणे जीवा धीर नाहीं ॥४॥

५.
कर कटावरी तुळसीच्या माळा ।
ऎसें रूप दोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी ।
ऎसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली ।
दाखवीं वहिली ऎसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी ।
आठवें मानसीं तें चि रूप ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस ।
विनंती उदास करूं नये ॥५॥

६.
गरुदाचें वारिकें कासे पीतांबर ।
सांवळें मनोहर कैं देखेन ॥१॥
बरवय बरवंटा घनमेघ सांवळा ।
वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ ।
वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥३॥
उद्दव अक्रूर उभे दोहींकडे ।
वर्णिती पवाडे सनकादिक ॥४॥
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा ।
तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥